Friday, August 11, 2006

मिटल्या डोळ्यात,
वितभर आभाळ,
स्म्रुतींची ओंजळ भरवीत...

वाटेत लागले,
फ़ुलांचे ताटवे,
रंगाचे तुकडे सजवती....

भ्रमर मन,
भाळता भाळले,
वेचत चालले आठव सारा....

म्रुद्गंध साजरा,
श्रावणी उभारा,
स्म्रुतींची सर रिमझिम...

ओलेत्या जाणीवा,
मायेचा विसावा,
पापणी लवता निर्माळल्या...

वाटेत राहिले,
सखे नी सांगाती,
गाव तो माझा अनोळखी....

सोडून चालले,
देहाचे कोंदण,
प्राणही माझे घोटाळती....

क्षितीज बोलवे,
विलीन व्हायला,
दूरचा प्रवास अनंताचा....

सरण पेटले,
रडून चालेना,
आसवे चिता विझवती....

- य३

Monday, July 17, 2006

'वाच'लो

mints, सुमेधा मला tag केल्याबद्दल आभार... खूप दिवसाने तुमचे ब्लॊग वाचतांना लक्षात आल, की मला २ महिन्यांपूर्वी खो मिळूनही मी ढीम्मऽऽ जागचा हललो नाहिये... चला, आता या निमित्ताने खूप दिवसापासून खंडीत झालेला माझा ब्लोग परत लिहिता होईल, आणि म्रुत ब्लॊगच्या यादीत जाण्यापासून वाचेल.... हा tagging चा खेळ माझ्यासाठी नवीनच आहे, पण लिहिण्याचा प्रयत्न करेन..
मी वाचलेल्या / मला आवडलेल्या पुस्तकांचा विचार करता करता आमची गाडी रीव्हर्स गियर मध्ये मागे जात जात अगदी माझ्या शाळेतल्या दिवसात गेली... लहान असतांना तशी मला वाचनाची फ़ारशी आवड नव्हती... चंपक, चांदोबा या पलिकडे कधी गेलो नाही...वाचन हे अभ्यासाशी निगडीत असल्याने अर्थातच पुस्तकांपेक्षा क्रीकेट्ची बॆट अधिक जवळची वाटायची. वाचनाचीही आवड किंवा छंद जोपासता येतो, ही गोष्ट पचनी पडायला म्हणा, किंवा वाचनाची आवड निर्माण व्हायला मला खूप वेळ लागला.... कधीतरी पाचवी- सहावीत असतांना कोणीतरी मला 'वेध विश्वाचा' हे पुस्तक भेट दिलं.. तेव्हा मला जऽऽरा वाचनाची गोडी निर्माण झाली.. त्यानंतर मग वाटेत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी पुस्तक भेटत गेली... science fiction (एच. जी. वेल्स च टाईम मशीन विशेषत: ), कथा-कादंबर्या, रहस्यकथा, आचार्य अत्रे, पु लं ची पुस्तके, अशी कितीतरी पुस्तकं भेटली... बरीचशी वाचनालयातून आणून वाचली, संग्रही ठेवली... अजूनही खूप वाचायची आहेत...
दोन तीन आठवड्यांपूर्वी भारतातून एक मित्र आला.. त्याने येतांना ५-६ पुस्तकं आणली ती वाचायचा प्रयत्न सध्या करतोय.

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक: रणजीत देसाई यांचे पावनखिंड

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती: छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला बळकटी आणणारे भक्कम बुरुज म्हणजे त्यांचे पराक्रमी शिलेदार मर्हाठी वीर. बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील रणजीत देसाईंचे पावनखिंड..... विशाळगडाजवळच्या घोडखिंडीत त्यांनी ३०० मावळ्यांनिशी दिलेल्या झुंजीची कथा, आख्यायिका म्हणून न मांडता, ऐतिहासिक नोंदींसह सत्यघटना म्हणून खूप साध्या शब्दात सांगतं, आणि वाचतांना अंगावर रोमांच पण उभे करत.

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
अघळ पघळ,
पुरचूंडी - पु ल
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पूरंदरे
म्रुत्युंजय - शिवाजी सावंत
उपरा - लक्ष्मण माने

४) अजुन वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
अंतस्थ - अशोक जैन यांचा पी. व्ही. नरसिंव्ह राव यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद
दुर्दम्य,
एका मुंगीचे महाभारत - गंगाधर गाडगीळ
तुघलक - गिरिश कर्नाडांच्या पुस्तकाचे विजय तेंडुलकरांचे भाषांतर
एक होता कार्व्हर
यादी न संपणारी आहे....

५) एका प्रिय पुस्तकाविशयी थोडेसे:
सुमेधा , तुमच्या "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" त ला शब्द न शब्द कॊपी करावासा वाटतोय... पूनरूक्ती होतेय... तरीही....
माझ अतिशय जिवलग पुस्तक, असा मी असामी .. पु लं च हे अजरामर पुस्तक कधीहि वाचायला घेतल , कोणतही पान उघडून वाचल की सगळी मरगळ उडून जाते... लगेचच हसू फ़ुटत... मी भारतात गेलो सुट्टीत, की घरी एकदा तरी पारायण करतो... घरात मी एकटाच स्वत:शी हसतांना दिसलो, की समजायच ..मी असामी वाचतोय.. ईथे अमेरिकेत laptop वर पु लं च्या च आवाजात त्यांच असामी च वाचन ऐकण म्हणजे तर एक आवडता छंदच होवून बसलाय.

Tuesday, May 09, 2006

हुश्श्श....

हुश्श...

संपलं बुवा एकदाच अजून एक सेमिस्टर...
रडत रडत परिक्षा, presentation, पेपर लिहिण या सगळ्यातून सुटका....
आता बर्याच दिवसापासून खंडीत झालेला ब्लॊग वाचण्याचा आणि लिहिण्याचा पोग्राम परत सुरू करता येइल...

Wednesday, April 19, 2006

भटस्पर्धा...

भटस्पर्धा...
आजच्या स्पर्धेच्या युगात कुठे कुठे स्पर्धा बघायला मिळेल काहि सांगता येत नाही बघा. बसच्या, लोकलच्या गर्दीत गाडीत चढायला स्पर्ध्रा, शाळा कॊलेजात अभ्यासाची स्पर्धा, नोकरी व्यवसायात दुसर्याला खाली दाबून वर जाण्याची स्पर्धा... ईत्यादी ईत्यादी. आता आमचा हा एक स्पर्धात्मक अनुभव वाचून बघा..

मागे कधीतरी मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो...तसं मी लग्नाच आमंत्रण सहसा टाळत नाही.. खर तर लग्न सोहळ्यापेक्षा मला लग्नाच्या पंगतीच जास्त आकर्षण आहे. आता पंगतीची जागा बुफ़े ने घेतली असली तरी काही ठिकाणी अजूनही आग्रहाच्या पंगती उठतात.. त्यामुळे लग्नाचा मुहुर्त साधला नाही तरी जेवणाचा मुहुर्त मी नक्कीच साधतो....आता माझे ते प्रिय समीक्षक मित्र मला खादाड, बकासूर, अशी काहितरी विशेषणं देतील.. पण तुर्तास आपण तिकडे दुर्लक्ष करूयात..
तर या लग्नाला कधी नाही ते आमच घोडं वरातीच्या खूप आधीच पोहोचल. ज्याच लग्न होत त्याच्याशी परिचय असल्याने (आता तुम्ही म्हणाल मी अपरिचित लोकांच्या लग्नालाही जातो का..? पण या ठिकाणी "जूना परिचय" किंवा "चांगली ओळख" असा अर्थ अभिप्रेत आहे)... तर ९ वाजून ४ मिनिटाचा मुहुर्त सापडावा म्हणून मी ब्राम्ह मुहुर्तावर (भल्या पहाटे सव्वा आठ वाजता) घर सोडल... लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मंडपात भटजी पूर्वतयारीत गुंतले होते. ..,एक असिस्टंट भटजी त्यांना मदत करत होते. वधुपक्षातील मंडळी वरातीच्या स्वागताच्या तयारीत होती, आजूबाजूला ओळखीच तस कोणीही नव्हत.. म्हणून मग मी खानपानाच्या टेबलाकडे मोर्चा वळवला. तिथे भरपेट नाश्ता करून सरबताचे २-३ ग्लास रिचवले आणि जेवणाच्या वेळेपर्यंत पोटाची सोय लागल्याच्या आनंदात मंडपात येऊन बसलो.
यथावकाश वरात आली... नवरदेव मंडपात आले.. थोड्या वेळाने त्यांची सौभाग्य कांक्षिणी नवरी अंतरपाठामागे येऊन उभी राहिली... आता काय ... लग्न लागेल.. चार अक्षता टाकून आपण परत वदनी कवळ घ्यायचा..... सगळ कस सुरळीऽऽत चाललय...वा:
"गंऽऽगा, सिंऽधू, सरस्वती च यमूनाऽऽऽ गोदाऽऽवरीऽऽ नरऽऽमदाऽऽऽऽ" सुरू झाल ...भटजींनी सूर लावला. "सावधाऽन" म्हटल्याबरोब्बर.. यव्हरी बडी... राईऽस...थ्रोऽऽऽ !!४-५ मंगलाष्ट्कं झाली..प्रत्येक "सावधाऽन" ला भरभरून अक्षता फ़ेक करून माझ्या हातातल्या अक्षता संपत आल्या होत्या.. चार दोन दाणे उरले होते ते "तदेव लग्नं..." ला उधळायचे म्हणून सांभाळले होते... पण त्या नंतर ते ज्युनियर भटजी पेटले हो... त्यांनी त्या सिनियर भटजींना फ़ुल कॊम्पिटिशन द्यायच ठरवल होत बहुतेक... आता त्यांनी त्यांचा किनरा सूर लावत अजून"ब्रुहस्पतीऽऽ च ऽऽ शशिऽऽनाऽऽ" वगैरे ग्रहांना आणि देवदेवतांना त्या लग्नमंडपात आमंत्रित करायला सुरुवात केली.. ते म्हणतांना ते वर आकाशाकडे नजर लावून खरोखर त्या ग्रहांशी संवाद साधल्यासारख करत होते... त्यांचा एकूण आग्रही सूर ऐकून हे सगळे ग्रह, त्या ३३ कोटी देवतांसह खरच तिथे अवतरतात की काय अस वाटून गेल खर...अहो भटजीनी असा काही "षड्ज" लावला होता म्हणता.. अहाहा.. माझ्या पोटातले कावळेच असा सूर लावणं जाणोत...
त्यानंतर मग वर्हाडी मंडळीतील काही उत्साही जन पुढे सरसावले... त्यांनी माईकचा ताबा घेतला...वधूपक्ष विरुद्ध वरपक्षातील गानसम्राटांनी सुरांच्या सगळ्या पट्ट्या वापरून डझनभर मंगलाष्टकं झडवली...
माझ्या कानावर ती मंगलाष्टक पडत होती, पण डोळ्यासमोर जिलब्यांच ताट येत होत... फ़क्त त्या जिलब्यांवर ताव मारण्याच्या आशेनेच मी तिथे त्या चार अक्षता हातात धरून मेणबत्तीसारखा उभा होतो... "मंगलाष्टकं आठच म्हणावीत असा जो वैदीक काळापासून प्रघात होता, त्याचा आजच्या स्पर्धात्मक जगात सद्यप्रचलीत अर्थ "प्रत्येकी आठ" असा रूढ झाला असावा.." अस समजून मी गप्प बसलो झाल..
शेवटी युगांतरानंतर कधीतरी ते भटजी, त्यांचे ते पूर्वाश्रमीचे असिस्टंट पण आत्ताच कॊम्पिटीटर झालेले भटजी, ती वधू आणि वरपक्षातील गंधर्व मंडळी... सगळ्यांचे तापलेले गळे शांत झाले... ती लग्नघटीका एकदाची भरली...आणि...

वाजवा रे वाजवा... अस कोणीतरी ओरडल्याबरोबर मी पहिल्या पंगतीत पसार झालो हे वेगळे सांगायला नकोच.

Thursday, April 06, 2006

अघळ पघळ आठ्वणी - शाळेतल्या

गेली कित्येक वर्ष मी शिकतो आहे...खर तर परीक्षा देतोय अस लिहायला हवं... कारण शाळा-कोलेजातल पुस्तकं वाचून मिळणार शिक्षण फ़क्त परीक्षे पुरत मर्यादीत ठेवण्याचा शहाणपणा अगदी लहानपणीच, कुणीही न शिकवताच मी आत्मसात केला होता. माझी विद्यार्थी दशा अजूनही सुरू असली तरी मी खर सांगायच तर परीक्षार्थीच. अभ्यास हा फ़क्त परीक्षा तोंडावर आली की करावा लागणारा व्याप आहे, क्रीकेट, गोट्या, भोवरे, हे आमचे आवडते खेळ आम्हाला खेळता येऊ नयेत म्हणून शाळेने हा खटाटोप केलाय अस माझ परखड मत होत...
शाळेत अभ्यासापेक्षा मित्रांबरोबर खेळणं, मधल्या सुटीत डब्यांची वाटा-वाटी, वर्गातली दंगा मस्ती याच गोष्टींच आकर्षण अधिक. मराठी, गणित, आणि शास्त्र या विषयात तसे मला बर्यापैकी मार्क्स मिळत... पण ई भू ना म्हणजे ईतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र ह्या विषयाच्या पेपरवर मात्र एक आकडी संख्या असायची.. त्यातही भूगोलाच्या पेपरवर तर बहुतेक वेळेस गोल भोपळ्याच चित्र काढून मिळायच...
याच भूगोलाच्या तसाला खाडीलकर बाई त्रूतुंची नावं पाठ करायला लावायच्या....
आम्ही मूलं मग सगळे सूरात...( प्रत्येक जण आपापला स्वतंत्र सूर लावत)... त्या परिक्षेत ४ मार्काला येणार्या प्रश्नाचं उत्तर पाठ करायचो...
ग्री‍ऽऽष्म , वऽऽर्शा, हेऽऽमंत, शीऽऽशिर, वसंऽऽत, श‍ऽरऽद.... , मग ऊन्हाऽळा,.... हिवाऽळा, पावसाऽळा....
मला काहि म्हणता काही केल्या ही सगळी 'लिस्ट॒' काही लक्षात रहायची नाही... वसंत, हेमंत अशी मुलांची नाव त्रूतुंना देण्याची काय आवश्यकता ह्याचा संदर्भ चूकूनही लागत नसे... त्यातल्या त्यात "वर्षा" मात्र माझ्या बरोब्बर ध्यानात रहायचं.. खर तर रहायची असं म्हटलं पाहिजे... आमच्या वर्गात वर्षा जोशी नावाची एक हुशार मुलगी होती.... तिचा नेहमीच सगळ्या विषयात पहिला नंबर येत असल्याने आम्हा मुलांना ती "अति-हुश्शार" श्रेणीतील वाटत असे. आणि आमच्या कुंडलीत पहिल्या वर्गात असल्यापसूनच 'अंत:क्रमांक ' योग असल्याने, आम्हा शेवटल्या बाकावर बसणार्या मुलांचा म्हणून उगीचच तिच्यावर राग होता.. ग्रीष्म, हेमंत, वसंत वगैरे मुलांमधे ही चोंबडी मुलगी आल्याने मग आम्ही पाठांतराच्या वेळेस "वऽऽऽरऽऽशा" असा प्रत्येक अक्षरावर विशेष जोर देत तिला चिड्वण्याचा प्रघात चालवला होता.

अगदी चौथी पाचवीत असतांना पासून आमच्या वर्गात अशी मुलं विरु्द्ध मुली स्पर्धा असायची... मुली अभ्यासात आम्हा backbenchers ला मागे टाकत , तर मुलं खेल-कूद प्रकारात पूढे... क्रिकेट म्हणजे तर जीव की प्राण अगदी.. मधल्या सुटीतच नाही तर वर्गातही, जरा कुठे बाई वर्गाबाहेर गेल्या की खोड रबराचा बा॑ल आणि वहीची ब॑ट करून आमचं क्रिकेट सुरू... मैदानावर तुकडी अ विरूद्ध तुकडी ब असे क्रिकेट चे सामने खूप रंगत असत... कपिल देव, गावसकर हे आमचे आदर्श... कधी एखाद्या वेळेस मला चुकून ३-४ विकेट्स मिळत. मग पुढचे काहि दिवस माझा "कपिल" व्हायचा. कॊलर ताठ एकदम.. परिक्षेत मग हा ताठ्या उतरत असे...

तर काय सांगत होतो... हं. खर तर पावसाळा हा माझा सगळ्यात आवडता त्रुतू. आम्ही भोलानाथ ला साकडं घातलं की तो बरोब्बर सकाळी सकाळी पाऊस पाडून मग आमच्या शाळेभोवती पाणी साचवत असे. आमच्या दूर्दैवाने, शाळा मात्र कधीच त्या पाण्यात बुडाली वगैरे नाही आणि कधी सुट्टी मिळाली नाही...शाळा बुडवून पावसात भिजण्याची पर्वणी मात्र मी कधीच हुकत नसे. घरून निघतांना आई अंगात रेनकोट चढवून देत असे. मग रि्परीपणार्या पावसात बाहेर पडायचा अवकाश , मात्र तो रेनकोट अंगातून काढून कमरेला गुंडाळला जात असे.. मग मी आणि गल्लीतले बाकी सौंगडी.. भिजत, हुंदडत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, शाळेत अर्थातच ऊशीरा पोहोचत असू.. तिथे खाडीलकर बाईंच्या छडीचे वळ ओल्या पाठीवर ऊमटत असतांना पहिल्या बाकावरून वर्षा आणि कंपनी हसत असायची.. मग तर आम्हा मुलांचा पारा अजूनच वर चढायचा.

सगळ लक्ष अभ्यासापेक्षा क्रीकेट खेळण्यावर केंद्रीत असल्याने साहजिकच आम्ही त्या वर्षी "भूगोलाच्या" पेपरात गचकलो. माझ्यासाठी समाधानाची बाब ही होती की लाल शेरा मारलेल्या प्रगती पुस्तकांच्या गठ्ठ्यात माझ्या बरोबरच माझे इतरही काही वर्गबंधू विराजमान होते....सुदैवाने 'वरच्या वर्गात घातला' असं म्हणून शाळेने आम्हाला वरच्या वर्गात ढकललं.. वर्ग बदलला तरी बाक मात्र शेवटच्या लाईनीतच... मागच्या लाइनीत आमचा टुकार कंपू तर पहिल्या बाकावर वर्षा आणि कंपनी.

ही चढाओढ चांगली नववी दहावी पर्यंत चालली...कालेजात आल्यावर मुलींबद्दलच्या राग, मत्सर, वगैरे वगैरे या भावनांची जागा आणि काही विवक्षीत भावनांनी घेतली...(सू्. सां. न लगे..:-)... पण तोपर्यंत आम्ही 'स्व प्रमादे प्रसिद्ध' झाल्याने तेव्हाही आमच्या नशीबी 'अंत: क्रमांक योगच..' ..असो.

परवा कुठेतरी शाळेतल्या आठवणींवर एक लेख वाचला आणि या आठवणी 'ताजा' झाल्या.. जशा आठवल्या तशाच असंबद्ध लिहून काढल्या...

Wednesday, April 05, 2006

फोटो..

बरेच दिवसांपासून नवीन क॔मेरा घ्यायचा विचार करत होतो...
मला आवडलेला क॔मेरा बराच महाग असल्याने माझ्या शिष्यव्रुत्तीच्या पैशातून पैक्याला पैका जोडून
शेवटी मागच्या आठवड्यात तो घेतला एकदाचा... आणि मग काय... प्रयोग सुरू... माझ्या युनिव्ह्रसिटी मध्ये यत्र तत्र सर्वत्र कचा कच फोटो काढण्याच सत्र चालू झालय.. त्यातले काहि "बरे" आलेले फोटो ईथे प्रकाशित करत आहे.

लहान मुलाच्या हातात खेळण दिलं की कसा तो बाकी खेळणी विसरून सारखा त्याच नवीन खेळण्याशी खेळत राहतो, तस काहिस झालय आता माझं...

Sunday, March 19, 2006

"अहो.. आरम्भशूर:


मी ब्लोग लिहायला सुरुवात केलिये हि बाब 'बातमी' या सदरात येते हे मला माहितच नव्हतं. तशी ही 'बातमी' मी जमेल तितकी माझ्या मित्रांपासून आणि एकूणच आमच्या गावातल्या गावकर्यापासून गुप्तच ठेवली होती...
मी गेले तब्बल ३-४ आठवडे गुप्तपणे ब्लोग लिहितो आहे.. आता तुम्ही सगळे 'मराठीब्लो्गनेट' वासी आपलेच आहात हो.. तुमच्याशी आमचा गुप्ततेचा अलिखित करार आहेच...
पण ही बातमी गुप्त ठेवायला एक कारण आहे.. -
त्याच काय आहे की, ब्लोग लिहिण ही तशी 'माह्या' सहित्यिक गिरी ची सुरुवात असली तरी मी फ़ार महत्वाकांक्शी आहे बर.... भविष्यात माझ्या हातून (माफ़ करा.. माझ्या सूपीक डोक्यातून... ) श्रेष्ठ, प्रसिद्ध आणि चिरंतन अस काहितरी साहित्य प्रस्रुत होणार आहे ह्याबद्द्ल मला तीळ्मात्रही शंका नाही. मागील बर्याच वर्षांचा कालावधी मी रसायनशास्त्रातील गहन प्रश्नांची ऊकल करण्यात व्यर्थ दवडला असला तरी परवाच माझ्या एका जीव:श्च कंठ:श्च शास्त्रद्न्य मित्राने "माझ्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करता माझ्या मेंदूतील शास्त्रीय कोडी सोडवणार्या भागापेक्शा कलागुणांच डीपार्टमेंट जास्त 'चालू' (active अशा अर्थाने बर का) आहे " अस सूतोवाच केलं.
म्हणूनच मी मानव जातीच्या कल्याणास्तव लेखन कराव, साहित्यात भरीव कामगिरी करावी... म्हणजे प्रथम (सू)प्रसिद्ध मासिकात 'पिझ्झा बर्गर संस्क्रुतीचा महिला मुक्ती आंदोलनावरील अनुकूल प्रभाव' या विषयावर शास्त्रशुद्ध लिखाण (ही कल्पना अलिकडेच दुसर्या लेखात वाचली, ती लगेच 'चोरून' त्यावर मी तद्न्य बुद्धीने श्रेष्ट लिखाण कराव), मग एका दिवाळी अंकात नव कविता, किंवा दुसर्याचा लेख स्वत:च्या नावावर छापणं, मग पाच सहा रहस्यमय इंग्रजी कांदंबर्यांच भाषांतर करून 'स्व'नामे प्रसिद्ध करणे, मग भूताखेताच्या विनोदी कथा असलेले दोन तीन संग्रह (ह्या कथा नंतर रामसेंना विकून पैसा कमवता येइल ही दूऽरद्रुष्टी), त्यानंतर जमल तर एखाद वैचारीक पुस्तक वगैर लिहावीत असा सुद्न्य विचार मी केला....

व्यक्तीत: मला स्वत:ला प्रसिद्ध लेखक वगैरे होण्याची फ़ारशी इच्छा नसली तरी न जाणो मनात आलेल इथे खरडता खरडता पुढे मी समाज प्रभोधनकारी लेखन करेनही बहुतेक.. बहुतेक म्हण्जे काय करेनच.
पण हे सगळ गुप्त पणे करायच, कारण 'अस महत्कार्य माझ्या हातून व्हायच असेल तर माझ लिखाण मी समीक्शकांपासून लपवून ठेवाव' असा सल्ला मला माझ्या त्याच जीव:श्च कंठ:श्च मित्राने दिला. (कारण समीक्शक लोकांच्या पुढे काहि माझ चोरलेल लिखाण खपणार नाहि , हे सत्य तो वदावयास विसरला बहुतेक... तो बोलला असता तरी मी सोयिस्करपणे तिकडे 'काना'डोळा केला असता ..)
तर जमेल तितक्या गुप्तपणे होइल तेवढे लिखाण करून मग मला जेव्हा कोणता तरी पुरस्कार मिळेल तेव्हा कळेलच ना सगळ्यांना...

पण कशी कोण जाणे, बातमी फ़ुटली.. माझी तब्बल तीन चार आठवड्यांची प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीची स्वप्नं क्शणभंगूर ठरली.
माझ्या ईंटरनेटवरील अनूदिनीचा वास लागताच माझे समीक्शक मित्र इंटरनेट वर तासं तास मी केव्हा काहितरी लिहितो आणि कधी ते माझ्या लिखाणाची चिर्फ़ाड करतात याची वाट बघू लागले... काहिंनी माझ्या ब्लोग ला वारंवार भेटी देऊन मी काही लिहिल नसतांनाही "माझ्या कवितांतील कल्पनांचा आशय फ़ाऽऽऽर गहन आहे, माझी लेखन शैली कशी ओघवती आहे" यावर भाष्य पण केलं. म्हण्जे काय - तुम लिखो, हम उसके चिथडे कर के फ़डशा पाडने के लिये ऊतावीळ है..!
मी हा छुपा संदेश लक्शात घेऊनच मागचे २-३ आठवडे माझ्या प्रतिभेला दावणीला बांधून ठेवून , न लिहिता काढले.
पण मग माझे काहि समीक्शक मित्र वैचारीक उपवासाला बसल्याचीही बातमी माझ्या कानावर आली... त्यांचा हा उपवास हा 'मी काहितरी लिखाण कराव ' ही त्यांची मागणी मान्य होण्यासाठीचा भुक हडताल होता अशी मखलाशी त्यांनी केली असली तरी तो उपवास म्हणजे 'मेजवानीपूर्वीच लंघन' आहे हे ओळखण्या इतका मी चतुर आहे....
तो गड सर होत नाही अस बघून मग त्यांच्यातल्या काहिंनी माझ्या ब्लोग वर "अहो.. आरम्भशूर:' अशा संस्क्रुतोद्भव मायन्याचे मजकूर लिहून मला लेखनास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला..

तरी मी बधलेलो नाहिये हे पाहून काहिंनी कोथरूड डेपो ते डेक्कन असे पौड आणि कर्वे रस्त्यावर निषेधात्मक मोर्चे पण काढल्याच संध्यानंद मध्ये परवा छापल होत म्हणे... ही ऐकीव माहिती आहे, कारण सध्या मी अमेरिकेच्या फ़ारीन मध्ये 'हालिवूड्च्या चित्रपटांतील कल्पना माझ्या कादंबरीत 'घुसवण्या' योग्य आहेत की नाही' याचा अभ्यास करत असल्याने तसा भारतातील महत्वाच्या घडामोडींपासून दूर आहे.
पण आता मात्र लै हाइट झाली... या मोर्च्यांमुळे मात्र मला खूप राग आला आहे... माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाची चालवलेली अशी बदनामी...?
आता बघा मी काय करतो...
काय करणार हो..! फ़ार तर इकडून एक तिकडून दोन नवकल्पना चोरून "मम" म्हणुन लिहिणार...
असो....
माझ्या समीक्शक मित्रांनो,.. हि तुम्हास शरणचिठ्ठी....

तुमचाच
य३
भावी साहित्यसम्राट,
साहित्यसंमेलनाध्यक्श, ई. स. .......(साल तुम्ही भरून घ्या... तसा मी फ़ार बीजी हाय, पन तुमच्यासाठी वेळ काढेन ना..!)