Wednesday, April 19, 2006

भटस्पर्धा...

भटस्पर्धा...
आजच्या स्पर्धेच्या युगात कुठे कुठे स्पर्धा बघायला मिळेल काहि सांगता येत नाही बघा. बसच्या, लोकलच्या गर्दीत गाडीत चढायला स्पर्ध्रा, शाळा कॊलेजात अभ्यासाची स्पर्धा, नोकरी व्यवसायात दुसर्याला खाली दाबून वर जाण्याची स्पर्धा... ईत्यादी ईत्यादी. आता आमचा हा एक स्पर्धात्मक अनुभव वाचून बघा..

मागे कधीतरी मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो...तसं मी लग्नाच आमंत्रण सहसा टाळत नाही.. खर तर लग्न सोहळ्यापेक्षा मला लग्नाच्या पंगतीच जास्त आकर्षण आहे. आता पंगतीची जागा बुफ़े ने घेतली असली तरी काही ठिकाणी अजूनही आग्रहाच्या पंगती उठतात.. त्यामुळे लग्नाचा मुहुर्त साधला नाही तरी जेवणाचा मुहुर्त मी नक्कीच साधतो....आता माझे ते प्रिय समीक्षक मित्र मला खादाड, बकासूर, अशी काहितरी विशेषणं देतील.. पण तुर्तास आपण तिकडे दुर्लक्ष करूयात..
तर या लग्नाला कधी नाही ते आमच घोडं वरातीच्या खूप आधीच पोहोचल. ज्याच लग्न होत त्याच्याशी परिचय असल्याने (आता तुम्ही म्हणाल मी अपरिचित लोकांच्या लग्नालाही जातो का..? पण या ठिकाणी "जूना परिचय" किंवा "चांगली ओळख" असा अर्थ अभिप्रेत आहे)... तर ९ वाजून ४ मिनिटाचा मुहुर्त सापडावा म्हणून मी ब्राम्ह मुहुर्तावर (भल्या पहाटे सव्वा आठ वाजता) घर सोडल... लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मंडपात भटजी पूर्वतयारीत गुंतले होते. ..,एक असिस्टंट भटजी त्यांना मदत करत होते. वधुपक्षातील मंडळी वरातीच्या स्वागताच्या तयारीत होती, आजूबाजूला ओळखीच तस कोणीही नव्हत.. म्हणून मग मी खानपानाच्या टेबलाकडे मोर्चा वळवला. तिथे भरपेट नाश्ता करून सरबताचे २-३ ग्लास रिचवले आणि जेवणाच्या वेळेपर्यंत पोटाची सोय लागल्याच्या आनंदात मंडपात येऊन बसलो.
यथावकाश वरात आली... नवरदेव मंडपात आले.. थोड्या वेळाने त्यांची सौभाग्य कांक्षिणी नवरी अंतरपाठामागे येऊन उभी राहिली... आता काय ... लग्न लागेल.. चार अक्षता टाकून आपण परत वदनी कवळ घ्यायचा..... सगळ कस सुरळीऽऽत चाललय...वा:
"गंऽऽगा, सिंऽधू, सरस्वती च यमूनाऽऽऽ गोदाऽऽवरीऽऽ नरऽऽमदाऽऽऽऽ" सुरू झाल ...भटजींनी सूर लावला. "सावधाऽन" म्हटल्याबरोब्बर.. यव्हरी बडी... राईऽस...थ्रोऽऽऽ !!४-५ मंगलाष्ट्कं झाली..प्रत्येक "सावधाऽन" ला भरभरून अक्षता फ़ेक करून माझ्या हातातल्या अक्षता संपत आल्या होत्या.. चार दोन दाणे उरले होते ते "तदेव लग्नं..." ला उधळायचे म्हणून सांभाळले होते... पण त्या नंतर ते ज्युनियर भटजी पेटले हो... त्यांनी त्या सिनियर भटजींना फ़ुल कॊम्पिटिशन द्यायच ठरवल होत बहुतेक... आता त्यांनी त्यांचा किनरा सूर लावत अजून"ब्रुहस्पतीऽऽ च ऽऽ शशिऽऽनाऽऽ" वगैरे ग्रहांना आणि देवदेवतांना त्या लग्नमंडपात आमंत्रित करायला सुरुवात केली.. ते म्हणतांना ते वर आकाशाकडे नजर लावून खरोखर त्या ग्रहांशी संवाद साधल्यासारख करत होते... त्यांचा एकूण आग्रही सूर ऐकून हे सगळे ग्रह, त्या ३३ कोटी देवतांसह खरच तिथे अवतरतात की काय अस वाटून गेल खर...अहो भटजीनी असा काही "षड्ज" लावला होता म्हणता.. अहाहा.. माझ्या पोटातले कावळेच असा सूर लावणं जाणोत...
त्यानंतर मग वर्हाडी मंडळीतील काही उत्साही जन पुढे सरसावले... त्यांनी माईकचा ताबा घेतला...वधूपक्ष विरुद्ध वरपक्षातील गानसम्राटांनी सुरांच्या सगळ्या पट्ट्या वापरून डझनभर मंगलाष्टकं झडवली...
माझ्या कानावर ती मंगलाष्टक पडत होती, पण डोळ्यासमोर जिलब्यांच ताट येत होत... फ़क्त त्या जिलब्यांवर ताव मारण्याच्या आशेनेच मी तिथे त्या चार अक्षता हातात धरून मेणबत्तीसारखा उभा होतो... "मंगलाष्टकं आठच म्हणावीत असा जो वैदीक काळापासून प्रघात होता, त्याचा आजच्या स्पर्धात्मक जगात सद्यप्रचलीत अर्थ "प्रत्येकी आठ" असा रूढ झाला असावा.." अस समजून मी गप्प बसलो झाल..
शेवटी युगांतरानंतर कधीतरी ते भटजी, त्यांचे ते पूर्वाश्रमीचे असिस्टंट पण आत्ताच कॊम्पिटीटर झालेले भटजी, ती वधू आणि वरपक्षातील गंधर्व मंडळी... सगळ्यांचे तापलेले गळे शांत झाले... ती लग्नघटीका एकदाची भरली...आणि...

वाजवा रे वाजवा... अस कोणीतरी ओरडल्याबरोबर मी पहिल्या पंगतीत पसार झालो हे वेगळे सांगायला नकोच.

4 Comments:

Blogger GD said...

"सावधाऽन" म्हटल्याबरोब्बर.. यव्हरी बडी... राईऽस...थ्रोऽऽऽ !!<<<

bhayankar hasalo!! :o)

ekuNach lekh ekadam 'khamang' 'zalay'! :D

2:46 PM  
Blogger Shilpa Datar said...

nice experience of reading

6:38 AM  
Blogger Milind said...

एकदम मार्मिक आणि रसभरीत वर्णन आहे.
जिलब्यांचा उल्लेख आहे म्हणूनही रसभरीत :)
"ज्युनियर भटजी पेटले हो... त्यांनी त्या सिनियर भटजींना फुल कॉम्पिटिशन द्यायच ठरवल होत" हे तर लग्नात अगदी हमखास दिसणारं दृश्य.

8:43 AM  
Blogger Y3 said...

gd, विन्चूरकरी, मिलिंद...
धन्यवाद..!!

4:34 PM  

Post a Comment

<< Home