गेली कित्येक वर्ष मी शिकतो आहे...खर तर परीक्षा देतोय अस लिहायला हवं... कारण शाळा-कोलेजातल पुस्तकं वाचून मिळणार शिक्षण फ़क्त परीक्षे पुरत मर्यादीत ठेवण्याचा शहाणपणा अगदी लहानपणीच, कुणीही न शिकवताच मी आत्मसात केला होता. माझी विद्यार्थी दशा अजूनही सुरू असली तरी मी खर सांगायच तर परीक्षार्थीच. अभ्यास हा फ़क्त परीक्षा तोंडावर आली की करावा लागणारा व्याप आहे, क्रीकेट, गोट्या, भोवरे, हे आमचे आवडते खेळ आम्हाला खेळता येऊ नयेत म्हणून शाळेने हा खटाटोप केलाय अस माझ परखड मत होत...
शाळेत अभ्यासापेक्षा मित्रांबरोबर खेळणं, मधल्या सुटीत डब्यांची वाटा-वाटी, वर्गातली दंगा मस्ती याच गोष्टींच आकर्षण अधिक. मराठी, गणित, आणि शास्त्र या विषयात तसे मला बर्यापैकी मार्क्स मिळत... पण ई भू ना म्हणजे ईतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र ह्या विषयाच्या पेपरवर मात्र एक आकडी संख्या असायची.. त्यातही भूगोलाच्या पेपरवर तर बहुतेक वेळेस गोल भोपळ्याच चित्र काढून मिळायच...
याच भूगोलाच्या तसाला खाडीलकर बाई त्रूतुंची नावं पाठ करायला लावायच्या....
आम्ही मूलं मग सगळे सूरात...( प्रत्येक जण आपापला स्वतंत्र सूर लावत)... त्या परिक्षेत ४ मार्काला येणार्या प्रश्नाचं उत्तर पाठ करायचो...
ग्रीऽऽष्म , वऽऽर्शा, हेऽऽमंत, शीऽऽशिर, वसंऽऽत, शऽरऽद.... , मग ऊन्हाऽळा,.... हिवाऽळा, पावसाऽळा....
मला काहि म्हणता काही केल्या ही सगळी 'लिस्ट॒' काही लक्षात रहायची नाही... वसंत, हेमंत अशी मुलांची नाव त्रूतुंना देण्याची काय आवश्यकता ह्याचा संदर्भ चूकूनही लागत नसे... त्यातल्या त्यात "वर्षा" मात्र माझ्या बरोब्बर ध्यानात रहायचं.. खर तर रहायची असं म्हटलं पाहिजे... आमच्या वर्गात वर्षा जोशी नावाची एक हुशार मुलगी होती.... तिचा नेहमीच सगळ्या विषयात पहिला नंबर येत असल्याने आम्हा मुलांना ती "अति-हुश्शार" श्रेणीतील वाटत असे. आणि आमच्या कुंडलीत पहिल्या वर्गात असल्यापसूनच 'अंत:क्रमांक ' योग असल्याने, आम्हा शेवटल्या बाकावर बसणार्या मुलांचा म्हणून उगीचच तिच्यावर राग होता.. ग्रीष्म, हेमंत, वसंत वगैरे मुलांमधे ही चोंबडी मुलगी आल्याने मग आम्ही पाठांतराच्या वेळेस "वऽऽऽरऽऽशा" असा प्रत्येक अक्षरावर विशेष जोर देत तिला चिड्वण्याचा प्रघात चालवला होता.
अगदी चौथी पाचवीत असतांना पासून आमच्या वर्गात अशी मुलं विरु्द्ध मुली स्पर्धा असायची... मुली अभ्यासात आम्हा backbenchers ला मागे टाकत , तर मुलं खेल-कूद प्रकारात पूढे... क्रिकेट म्हणजे तर जीव की प्राण अगदी.. मधल्या सुटीतच नाही तर वर्गातही, जरा कुठे बाई वर्गाबाहेर गेल्या की खोड रबराचा बा॑ल आणि वहीची ब॑ट करून आमचं क्रिकेट सुरू... मैदानावर तुकडी अ विरूद्ध तुकडी ब असे क्रिकेट चे सामने खूप रंगत असत... कपिल देव, गावसकर हे आमचे आदर्श... कधी एखाद्या वेळेस मला चुकून ३-४ विकेट्स मिळत. मग पुढचे काहि दिवस माझा "कपिल" व्हायचा. कॊलर ताठ एकदम.. परिक्षेत मग हा ताठ्या उतरत असे...
तर काय सांगत होतो... हं. खर तर पावसाळा हा माझा सगळ्यात आवडता त्रुतू. आम्ही भोलानाथ ला साकडं घातलं की तो बरोब्बर सकाळी सकाळी पाऊस पाडून मग आमच्या शाळेभोवती पाणी साचवत असे. आमच्या दूर्दैवाने, शाळा मात्र कधीच त्या पाण्यात बुडाली वगैरे नाही आणि कधी सुट्टी मिळाली नाही...शाळा बुडवून पावसात भिजण्याची पर्वणी मात्र मी कधीच हुकत नसे. घरून निघतांना आई अंगात रेनकोट चढवून देत असे. मग रि्परीपणार्या पावसात बाहेर पडायचा अवकाश , मात्र तो रेनकोट अंगातून काढून कमरेला गुंडाळला जात असे.. मग मी आणि गल्लीतले बाकी सौंगडी.. भिजत, हुंदडत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, शाळेत अर्थातच ऊशीरा पोहोचत असू.. तिथे खाडीलकर बाईंच्या छडीचे वळ ओल्या पाठीवर ऊमटत असतांना पहिल्या बाकावरून वर्षा आणि कंपनी हसत असायची.. मग तर आम्हा मुलांचा पारा अजूनच वर चढायचा.
सगळ लक्ष अभ्यासापेक्षा क्रीकेट खेळण्यावर केंद्रीत असल्याने साहजिकच आम्ही त्या वर्षी "भूगोलाच्या" पेपरात गचकलो. माझ्यासाठी समाधानाची बाब ही होती की लाल शेरा मारलेल्या प्रगती पुस्तकांच्या गठ्ठ्यात माझ्या बरोबरच माझे इतरही काही वर्गबंधू विराजमान होते....सुदैवाने 'वरच्या वर्गात घातला' असं म्हणून शाळेने आम्हाला वरच्या वर्गात ढकललं.. वर्ग बदलला तरी बाक मात्र शेवटच्या लाईनीतच... मागच्या लाइनीत आमचा टुकार कंपू तर पहिल्या बाकावर वर्षा आणि कंपनी.
ही चढाओढ चांगली नववी दहावी पर्यंत चालली...कालेजात आल्यावर मुलींबद्दलच्या राग, मत्सर, वगैरे वगैरे या भावनांची जागा आणि काही विवक्षीत भावनांनी घेतली...(सू्. सां. न लगे..:-)... पण तोपर्यंत आम्ही 'स्व प्रमादे प्रसिद्ध' झाल्याने तेव्हाही आमच्या नशीबी 'अंत: क्रमांक योगच..' ..असो.
परवा कुठेतरी शाळेतल्या आठवणींवर एक लेख वाचला आणि या आठवणी 'ताजा' झाल्या.. जशा आठवल्या तशाच असंबद्ध लिहून काढल्या...